सरस्वती विद्यालय, राबोडी येथे आषाढी एकादशीनिमित्त ‘वारी प्रबोधन’ उत्साहात संपन्न
“बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल!
श्री ज्ञानदेव तुकाराम!
पंढरीनाथ महाराज की जय!”
टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि विठ्ठलनामाने दुमदुमलेली राबोडी...
जणू चंद्रभागेच्या तीरावरची पंढरीच सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात अवतरली होती. निमित्त होते आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ‘वारी प्रबोधन’ सोहळ्याचे.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सरस्वती विद्यालय, राबोडी येथे भक्ती,
संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा अनोखा त्रिवेणी संगम घडवून आणण्यात आला. पर्यावरण संरक्षण, सामाजिक सलोखा, एकता आणि संतपरंपरेचा जागर हा संदेश देत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या वारीमध्ये सहभाग घेतला.
विद्यालयाच्या प्राचार्या पूनम भोगले मॅडम, ॲडमिन हेड देवयानी शुक्ल मॅडम, विनायक शिंदे सर , समन्वयिका मीनाक्षी बंगेरा मिस , रूपाली पवार मिस, तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी वारीचे सुंदर आणि शिस्तबद्ध नियोजन केले.
‘सावळे ते रूप गोजिरे...’ — जणू विठ्ठलच अवतरला!
वारीतील विद्यार्थ्यांनी केलेली पारंपरिक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
प्रिन्स सातपुते याने साकारलेला पांडुरंग पाहताना जणू,
“सावळे सुंदर रूप मनोहर,
पाहता लोचनी सुख होई...”
अशीच अनुभूती उपस्थितांना येत होती. त्याचे सावळे, साजिरे, मनोहर आणि गोजिरे रूप पाहून स्वतः पांडुरंगच भक्तांच्या भेटीला अवतरल्याचा भास होत होता. तर पृथा परब हिने साकारलेली रखुमाईची भूमिका विठ्ठल-रखुमाईच्या दिव्य दर्शनाची अनुभूती देत होती. विठ्ठल-रखुमाईच्या या मनोहारी रूपाने संपूर्ण वारीचे सौंदर्य अधिकच खुलून आले.
याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा साकारून महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचे आणि संस्कृतीचे जिवंत दर्शन घडविले. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत संपूर्ण वारी विठ्ठल भक्तीत रंगून गेली.
या भक्तिमय वातावरणात टाळकऱ्यांची साथ, भजनांचा नाद आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वारीला एक वेगळीच रंगत आली.
“या विठ्ठलाचा गजर,
हरिनामाचा झेंडा रोविला....
संतांचा... संतांचा,
मेळा गोपाळांचा डाव मांडियला ......”
या भावनेतून विद्यार्थ्यांनी भक्तीचा आणि आनंदाचा सुंदर मेळ साधला. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि “विठ्ठल..विठ्ठल...जय हरी विठ्ठल!” या जयघोषात संपूर्ण राबोडी परिसर भक्तिरसाने भारून गेला.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि आनंद पाहून जणू प्रत्येकाच्या अंतःकरणात विठ्ठलानेच आपलं स्थान निर्माण केले होते. काही क्षणांसाठी शाळेचे रूपांतरच ‘छोटी पंढरी’ झाले होते.
भजन-कीर्तनातून संस्कृतीचा जागर
वारीदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजनांनी आणि भक्तिगीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. अखंड सुरू असलेल्या भक्तिगीतांच्या स्वरांनी संपूर्ण राबोडी परिसर “विठ्ठलनामाच्या गजराने” दुमदुमून गेला.
वारीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांनी पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळत या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. भक्ती, आनंद आणि संस्कृतीचा हा सुंदर संगम अनुभवताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना दाटून आली—
“वारी म्हणजे केवळ पंढरीची वाटचाल नाही,
वारी म्हणजे संस्कारांची वाटचाल आहे;
वारी म्हणजे केवळ विठ्ठलाचे नामस्मरण नाही,
वारी म्हणजे माणुसकीचा जागर आहे!”
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आणि सामाजिक सलोख्याची शिकवण देत निघालेली ही वारी विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारांची अद्वितीय छाप उमटवून गेली.
टाळांचा नाद, हरिनामाचा गजर, संतांची वेशभूषा, फुगडीचा फेर आणि विठ्ठलाच्या जयघोषाने सजलेली ही वारी म्हणजे भक्ती, संस्कृती, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाचा अनुपम सोहळाच ठरला.
वारीचा हा अनोखा संगम पाहून अनेकांच्या दाटलेल्या कंठातून अखेरीस एकच भावस्पर्शी स्वर उमटला—
“याचसाठी केला अट्टहास...
अखेरचा दिस गोड व्हावा...”
KIRAN MHARASE
EDUCATOR
SVPT RABODI
Loading